अजुनही गावाकडे घराच्या अंगणात, परसात शोभिवंत फुलझाडे, फळझाडे , व भाजीपाला लावुन छान छोटीशी बाग तयार केली जाते . माझी हौस म्हणून मी आधी खिडक्यांमध्ये कुंड्या ठेवुन तसेच नंतर गच्चीवर त्यांत फुलझाडांचे संवर्धन करण्याचा प्रयन्त केला, बाग तयार करण्यापूर्वी जागेचा, ऋतू चा अभ्यास केला जातो. त्यानंतर कोणती फळझाडे, फुलझाडे लावावी, कधी लावावी, कशी लावावी याचा पण एक अभ्यास च आहे. तसेच कोणत्या ऋतुत कोणती झाडे चांगली येतील ते पाहणे पण खुप महत्वाचे आहे. आजकल शहरामध्ये जागेअभावी घराच्या गच्चीवर बाग करतात, मी पण असाच एक छोटा प्रयन्त केला आहे . मला नेहमी वाटत ही बाग आपल्याला आनंद देते , उत्साह निर्माण करते. त्याच बरोबर आपल्या घराची शोभा वाढवते. अशीच एक सजवलेली परसबाग तुमच्या भेटीला आणायची इच्छा आहे, जेणे करुण तुम्हाला पण याचा आनंद घेता येईल. या बागेतील एक न एक झाड़ाशी मी तुमची ओळख करून देणार आहे, त्याचबरोबर त्या झाडाची थोड़ी माहितीपण देण्याचा प्रयत्न करीन.
तर सुरवात करुया सर्वात प्रथम अश्या आपल्या सगळ्याच्या मनात एक घर केलेल्या अणि प्रत्येकाच्या घरीदारी असणाऱ्या 'तुळस ' पासून.
नाव - तुळस
शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल
कुळ - ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे.
प्रस्तावना -
युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.
अशी एक अख्यैका आहे, की तुळशीच्या पतीच्या मृत्यूनंतर प्रभू विष्णूने तुळशीला आपल्या प्रिय सखीप्रमाणे मानले होते. तेव्हा तुळशीने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतू विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मीसाठी आहे तर हृदय तुझ्यासाठी. तेव्हा तुळशीने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेव्हा विष्णूने होकार दिला. तेव्हापासून तुळस घर आणि मंदिराच्या बाहेर लावली जाते. भारतीय वेदशास्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे स्थान देण्यात आले आहे.अनेक घरात आजही अंगणात तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा करण्यात येते.दरवर्षी तुलसीविवाह झाल्यावरच घरात लग्नासारखे मंगल विधी करण्यात येतात. अध्यात्मिक महत्व असल्याने आजकाल शहरात देखील प्रत्येक घरी अगदी छोटेसे तरी तुळसीचे रोप आवर्जून लावण्यात येते.
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य-नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो. आयुर्वेदामध्ये तर तुळस या वनस्पतीला संजीवन औषधीचे स्थान देण्यात आलेले आहे.कारण तुळशीमध्ये असे विविध औषधी गुणधर्म आढळून येतात जे अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करतात.
तुळशीच्या जाती -
वेगवेगळ्या प्रदेशानुसार, तुळशीला वेगवेगळी नाव पडलेली आहेत. परंतु, असे असले तरी प्रत्येक वनस्पती ही जगभर एकाच शास्त्रीय नावाने (Botanical Name) ओळखली जाते. तुळशीच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील बहुतेक प्रजाती (Ocimum) या वंशात मोडतात. इंग्रजीत सर्व तुळशींना सरसकटपणे बेसिल (Basil) या नावाने संबोधले जाते.
या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत,एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो.
१. औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone (Ocimum viride)
तुळस सहज प्राप्त होणारी परंतु उच्चकोटीचे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. तिचे पान, खोड बी, सर्वच औषधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वस्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.
२. कापूर तुळस - Camphor basil (Ocimum kilimandscharicum) -
या तुळशीच्या पानांना कापराचा सुंगंध येतो. या तुळशीच्या तेलामध्ये 60 ते 80 % कापराचे प्रमाण असते. सर्दी, कफ, खोकला यावर कापूर तुळस गुणकारी ठरते. हर्बल टी बनवण्यासाठी ही तुळस उपयुक्त आहे.
३. कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum) -
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो.
४ . राम तुळस - Shrubby basil (Ocimum gratissimum) -
राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला 'लवंगी तुळस', असेही संबोधले जाते.
५ . काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Hoary basil (Ocimum americanum) -
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो.
तुळशीचे फायदे -
तुळशीस टाॅनिकही म्हंटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते त्यामूळे याचा वापर विविध आजारांवरही केला जातो . भारतात यास एक घरगूती औषधाचा भंडार मानले जाते. सर्दी खोकला ताप दांतदुखी श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, हृदयाचे विकार, हया सर्वांमध्ये तुळस वापरली जाते. तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास सर्दी खोकला बरा होतो. तुळस आपल्याला विविध संक्रमणापासून वाचवते. प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते.
तळटिप -
चांगली निचरा होणारी माती चांगल्या वनस्पतीच्या वाढीस मदत करते. पाण्याचा साठा केल्यामुळे रूट-रॉट होऊ शकते आणि स्टंट ग्रोथ होऊ शकते. उष्ण हवामान: अणि दमट परिस्थितीत हे झाड़ चांगले फुलते.
पुढील भागात अशाच एका दुसऱ्या झाडाबद्दल माहिती संगिन, पण त्याआधी वरील माहिती कशी वाटली, तुमचे काही अनुभव,विचार खाली कमेन्ट्स मध्ये नक्की शेयर करा.
No comments:
Post a Comment